भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( ९ मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दबदबा राखला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने झळकावलेले नाबाद दीडशतक आणि कॅमरून ग्रीनचे धडाकेबाज शतक हे ऑस्ट्रेलियन डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून भारतातील कसोटी शतकाचा मोठा दुष्काळ संपवला. सध्या ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत पहिल्या डावात चार गडी गमावून ३४७ धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाज आतापर्यंत दुसऱ्या दिवशी निष्प्रभ दिसले आणि त्यांना विकेट्सची आस लागली असून ती मिळाली नाही. दुस-या दिवशी आतापर्यंत २९ षटके टाकली आहेत, मात्र भारतीय संघाला आज एकही विकेट मिळाली नाही. सध्या उस्मान ख्वाजा ३५४ चेंडूत १५० धावा आणि कॅमेरून ग्रीन १४० चेंडूत १०० धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. ग्रीनने कसोटीमध्ये पहिले शतक झळकावले, त्याच्या या खेळीला १६ चौकारांचा साज होता. या दोघांमध्ये आतापर्यंत पाचव्या विकेटसाठी ३०४ चेंडूत १८५ धावांची भागीदारी झाली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून २५५ धावा केल्या होत्या. तिथून पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ग्रीन आणि खाव्जा यांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत सकाळच्या सत्रात एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या आहेत. सध्या ऑसीच्या ३५० धावा पूर्ण झाल्या आहेत.
तत्पूर्वी, अहमदाबादच्या सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हेड आणि ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. यानंतर हेड (३२) आणि लाबुशेन (३) बाद झाले, पण स्मिथने ख्वाजासोबत मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्थितीत आणले. स्मिथला (३८) अर्धशतक झळकावता आले नाही आणि त्याच्या पाठोपाठ आलेला पीटर हँड्सकॉम्ब (१७)ही छोट्या धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर ग्रीन आणि ख्वाजा यांनी एकही विकेट पडू दिली नाही. दरम्यान, ख्वाजानेही आपले शतक पूर्ण केले. त्याच वेळी, ग्रीन अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताकडून शमीने दोन आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.