भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या २-१ अशी आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताला ९ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. अशात मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. उभय संघातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने ५०० धावांचा टप्पाही पार केला आहे. पण रवींद्र जडेजाच्या खराब फटक्यावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर आणि इतर समालोचकांनी त्याच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत धावफलकावर ३ विकेट्स गमावत २८९ धावा केल्या होत्या. यावेळी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे ५९ आणि १६ धावांवर नाबाद राहिले होते. त्यानंतर भारताने ३ षटके खेळताच म्हणजेच डावातील १०२व्या षटकानंतर ३०० धावांपर्यंत पोहोचले. यावेळी विराट ६४, तर जडेजा २२ धावा केल्या. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली. मात्र, पुढे भारताला ३०९ धावांवरच चौथा धक्का बसला.

विराट आणि जडेजाची भागीदारी ६४ धावांवर तुटली. जडेजा यावेळी वैयक्तिक २८ धावांवर बाद झाला. त्याला टॉड मर्फी याने उस्मान ख्वाजा याच्या हातून झेलबाद केले. यावेळी नॉन-स्ट्रायकर एंडवर असणारा विराट त्याच्यावर प्रचंड नाराज झाला. तर ऑन एअर असणाऱ्या सुनील गावसकरांनी देखील फटकारले.जडेजाची ८४ चेंडूत २८ धावांची संयमी खेळी संपुष्टात आली तेव्हा समालोचन करत असलेले हर्षा भोगले म्हणतात, “जडेजाने ऑस्ट्रेलियाला एक विकेट आयती ताटात वाढून दिली आहे.”

जडेजाच्या या विकेटवर बोलताना गावसकर स्टार स्पोर्ट्सवरील सामन्याच्या कॉमेंट्री दरम्यान ऑन एअर म्हणाले, “काय झालं? कुणीतरी त्याला काही बोललं का? अचानक या विशिष्ट षटकात, त्याने हवेत फटका मारला.  त्याने मारलेला चौकारही यापेक्षा चांगला होता, ते बघा कोहलीला देखील फारसे रुचलेले नाही, आणि डगआउटही नाराज आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. प्रशिक्षक राहुल द्रविड या शॉटने प्रभावित होणार नाही. आणि त्याने याआधीही अशा जबाबदार खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे हा शॉट समजणे कठीण आहे.”

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: “अरे काय करतोस भावा!” शतकाच्या उंबरठ्यावर असताना किंग कोहली भडकला के. एस.भरतवर, पाहा Video

बाद होण्यापूर्वी जडेजाने असे दोन शॉट्स खेळले जे पूर्णपणे ऑस्ट्रेलियाला समजण्या पलीकडचे होते. या स्टार फलंदाजाने मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देत चौकार ठोकून मर्फीचे स्वागत केले. मात्र, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने जडेजाची विकेट घेतल्याने मर्फीला हसू अनावर झाले. सध्या टीम इंडिया ५०० धावांच्या पार पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test ravindra jadeja throws the wicket virat kohli disappointed commentators also criticized it avw