India vs Australia 5th T20 Match Updates : रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया सहा धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने २० षटकांत आठ विकेट गमावत १६० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या षटकात अर्शदीपने मिळवून दिला विजय –

अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत शेवटच्या षटकात १० धावा वाचवल्या. त्याने टीम इंडियाला सहा धावांनी विजय मिळवून दिला. अर्शदीपने २० व्या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडला बाद करून भारताचा विजय निश्चित केला होता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वेडला धावा काढू दिल्या नाहीत. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. जेसन बेहरेनडॉर्फ चौथ्या चेंडूवर केवळ एक धाव काढू शकला. आता ऑस्ट्रेलियाला दोन चेंडूंत नऊ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने सहा धावांनी सामना जिंकला.

मुकेश कुमारची शानदार गोलंदाजी –

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ विकेट गमावत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. टीम डेव्हिड १७ धावा करून बाद झाला, तर मॅथ्यू शॉर्ट १६ धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डीला सहा आणि जोश फिलिपला चार धावांवर बाद झाला. भारताकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

हेही वाचा – T-10 League : अभिमन्यू मिथुनच्या ‘नो बॉल’ने चाहत्यांना झाली मोहम्मद आमिरची आठवण, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

श्रेयस अय्यरने झळकावले शानदार अर्धशतक –

तत्पूर्वी, श्रेयस अय्यरने आपल्या टी-२० कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. अय्यरने संघाकडून सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याने ३७ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. अक्षर पटेलने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. जितेश शर्माने १६ चेंडूत २४ आणि यशस्वी जैस्वालने १५ चेंडूत २१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड १० आणि रिंकू सिंग सहा धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादव पाच धावा करून आणि रवी बिश्नोई दोन धावा करून बाद झाले. दोन धावा केल्यानंतर अर्शदीप नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 5th t20 match updates india beat australia by 6 runs vbm
Show comments