Abhishek Nayar Says It Is Not Easy For Rinku Singh Playing A Finishers Role Against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिलाय टी-२० सामना डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय टी-२० संघाचा फलंदाज रिंकू सिंग सज्ज आहे. या मालिकेत तो फिनिशरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने रिंकू सिंगचे कौतुक केले आहे आणि म्हटले की तो एक चांगला खेळाडू आहे, परंतु फिनिशरची भूमिका निभावणे कोणत्याही प्रकारे सोपे नाही.
रिंकू सिंगची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी –
२००९ मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळलेल्या अभिषेक नायरने डावखुरा फलंदाज रिंकू सिंगचे कौतुक केले. त्याने सांगितले की, कठोर परिश्रमाच्या जोरावर तो टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. जिओ सिनेमावर बोलताना अभिषेक नायर म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे. इथे येण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. तसेच जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा-तेव्हा त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे.’
अभिषेक नायर पुढे म्हणाला की, ‘त्याच्यासाठी फिनिशरची भूमिका निभावणे आणि आता भारतात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळणे हे त्याच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या संघाविरुद्ध फिनिशरची भूमिका निभावणे सोपे जाणार नाही, विशेषत: जेव्हा तुम्ही शेवटी आला असाल, तेव्हा जवळपास १० ते १२ चेंडू बाकी असतील. अशा स्थितीत कांगारू गोलंदाजांविरुद्ध पहिल्याच चेंडूपासून लयीत येणे किंवा मोठे फटके मारणे सोपे जाणार नाही. येथे त्याला कसे खेळायचे हे समजून घेणे आणि त्याचा खेळ पुढे नेणे आवश्यक आहे.’
आयपीएल २०२३ च्या हंगामानंतर रिंकू सिंगला आयर्लंडला दौऱ्यात झालेल्या मालिकेत संधी मिळाली. या मालिकेद्वारे आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली, तरी दुसऱ्या सामन्यातच त्याने प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला. रिंकू सिंग हा भारतीय टी-२० संघाचा एक सदस्य होता, ज्याने आशियाई क्रीडा २०२३ मध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नेपाळविरुद्ध त्याने १५ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी खेळली होती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पाच सामन्यासाठी दोन्ही देशाचे संघ –
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.