भारतीय संघाने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले. भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर सोमवारी (दि.१४ मार्च) चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघांच्या सहमतीने सामना अनिर्णित ठरला. अशाप्रकारे भारताने ही मालिका २-१ने खिशात घातली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्टार भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ‘जय श्री राम’ म्हणून आवाज देणाऱ्या घटनेच्या व्हायरल व्हिडिओवर आपले मौन सोडले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता या व्हिडिओंबाबत वक्तव्य केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे की, त्याने असा कोणताही व्हिडीओ पाहिला नाही किंवा त्याच्याकडे या घटनेची कोणतीही माहिती नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे आणि तिथे काय झाले ते मला माहित नाही. असे जर काही घडले असेल तर याची माहिती घेईन. जे काही घडले याबद्दल सविस्तर माहिती घेऊन उत्तर देईन.” असे तो म्हणाला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने ही मालिका २-१ अशी बरोबरीत जिंकली आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा सलग चौथा मालिका विजय आहे. या विजयासह भारताने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. ७ जून रोजी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
आत्तापर्यंत फक्त सहा कसोटी सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, “तो दीर्घ फॉर्मेट असणाऱ्या कसोटीमध्ये नेतृत्व करण्याच्या युक्त्या शिकत आहे.” पुढे रोहित शर्मा म्हणाला, “चार कसोटी सामन्यात आम्हाला जे साध्य करायचं होत ते आम्ही केलं आहे. नागपूर ते अहमदाबाद हा बॉर्डर-गावसकर मालिकेचा प्रवास खूप शिकवून जाणारा होता.”