भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी कसोटीपटू आणि भरवशाचे फलंदाज डीन जोन्स यांनी कोहलीला भडकवू नका, असा सल्ला दिला आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीला दडपणात ठेवता येईल, अशी गोलंदाजी करणे ऑस्ट्रेलियाला शक्य आहे. स्वस्थ न बसता त्याला त्रस्त करण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग करा. कोणत्याही परिस्थितीत त्याला तुमच्यावर स्वार होऊन वर्चस्व गाजवण्याची संधी देऊ नका, असा सल्ला माजी कर्णधार रिकी पॉँटिंगने दिला. या दरम्यान माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट याने विराट कोहलीची तुलना काही कर्तृत्वाने महान असलेल्या खेळाडूंशी केली आहे.

विराट कोहली हा उत्तम खेळाडू आहे. रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, शेन वॉर्न आणि मायकल जॉर्डन या महान खेळाडूंप्रमाणेच विराट कोहलीकडे अनेक गुण आहेत. त्याच्याकडे असलेली प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रखर विचारक्षमता यामुळेच तो या इतर महान खेळाडूंप्रमाणे ‘चॅम्पियन’ आहे, अशा शब्दात गिलख्रिस्टने कोहलीची प्रशंसा केली आहे.

 

खेळाडूच्या मानसिक सामर्थ्याला कमी लेखू शकत नाही. कारण हेच ‘चॅम्पियन’ खेळाडूचे शस्त्र असते. शेन वॉर्न, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स किंवा मायकल जॉर्डन साऱ्यांकडे प्रबळ विचारशक्ती आहे आणि ही विचारशक्तीच त्यांना पाठिंबा देत असते. मोठ्या फटाक्यांमध्ये जितकी ऊर्जा असते, त्याहीपेक्षा अधिक ऊर्जा मानसिक सामर्थ्यामध्ये असते आणि ती ऊर्जा कोहलीमध्ये आहे म्हणूनच तो या खेळाडूंप्रमाणे चॅम्पियन आहे, असेही गिलख्रिस्ट म्हणाला.

Story img Loader