विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्व एकदिवसीय मालिका जिंकली आणि इतिहास रचला. माजी कर्णधार अनुभवी महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात केली आहे आणि मालिका २-१ ने जिंकली.
उभय देशांत झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी२० मालिका बरोबरीत सुटली. मात्र कसोटी आणि एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी खिशात घातली. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला. सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यात त्याची अनुष्का शर्मा हिने त्याला दिलेला खास संदेश चर्चेचा विषय ठरला.
अनुष्काने ट्विट करत त्याला आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. ‘हा दौरा अविस्मरणीय आणि अद्वितीय ठरला. या दौऱ्यातील ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला आनंद आहे. टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा. आणि ‘माझं प्रेम’ विराट .. मला तुझा खूप अभिमान वाटतो’, अशा शब्दात तिने विराटला खास संदेश दिला.
What an unforgettable & outstanding tour it’s been !! Happy to have witnessed the historic victories by the men HUGE congratulations And so proud of you my love @imVkohli pic.twitter.com/QdAdN9OFaz
— Anushka Sharma (@AnushkaSharma) January 18, 2019
दरम्यान, या मालिकेत विराटने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. तो सामना भारताने जिंकला होता.