India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. भारताच्या उमेश यादव आणि आर. अश्विनने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच १९७ धावांवर सर्वबाद करत केवळ ८८ धावांची नाममात्र आघाडी घेता आली. केवळ ११ धावांत ६ विकेट्स घेत टीम इंडियाने कांगारूंना सळो की पळो करून सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या दिवशी फिरकीपटूंनी कहर केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनने पाच, नॅथन लायनने तीन आणि टॉड मर्फीने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या होत्या. तिथून पुढे खेळायला आज सुरुवात केल्यानंतर त्यात केवळ ३० धावांची भर त्यांना घालता आली.

पीटर हंड्स्कॉम्ब १९ धावा करून बाद झाला तर कॅमेरून ग्रीन २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी संख्या करता आली नाही. केवळ ११ धावांत ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स गमावल्या आणि १९७ धावांत संघ सर्वबाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि आर. अश्विनने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. सध्या ऑस्ट्रेलियाकडे ८८ धावांची आघाडी असून भारताचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत.

तत्पूर्वी, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर हा सामना जिंकण्याचे इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात रोहितला दोन जीवदान मिळाली. परंतु, तो याचा फायदा घेऊ शकला नाही. सहाव्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर भारताचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतू लागले. भारताने 45 धावांवर आपले पाच फलंदाज गमावले होते. त्यानंतर विराट कोहली व केएस भरत यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते देखील पहिल्या सत्रातच बाद होऊन परतले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताचे उर्वरित तीन फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाने यजमान संघाचा डाव १०९ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियासाठी कुन्हेमनने पाच फलंदाज बाद केले. तर, लायनने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला.

हेही वाचा: IND vs AUS: ‘…हम अपने मस्ती में!’ डीआरएस गमावल्यामुळे रोहित तणावात अन् किंग कोहली आपल्याच धुंदीत, Video व्हायरल

त्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात ही खराब झाली. ट्रॅविस हेड धावफलकावर १२ धावा असताना बाद झाला. शून्य धावेवर मिळालेल्या जीवनाचा फायदा घेत लाबुशेनने उस्मान ख्वाजासह ९६ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ३१ धावा करत तंबूत परतला. ख्वाजाने बाद होण्यापूर्वी शानदार ६० धावांची खेळी केली. कर्णधार स्मिथने २७ धावांचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus australia in 27 minutes umesh ashwin 3 3 wickets kangaroos lead by 88 runs avw
Show comments