भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या कर्णधाराचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाने २५ व्या षटकातच १५० धावांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे हा टप्पा गाठताना ऑस्ट्रेलियाने एकही गडी गमावला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एक विशेष विक्रमाची नोंद केली. सामन्यात ख्वाजाने शतक (१०४) केले, तर फिंचने झंझावाती ९३ धावा केल्या.

टीम इंडियाचा गेल्या वर्षभराचा इतिहास पाहता भारताने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात भारताविरुद्ध केवळ दोन वेळा सलामीवीरांनी दीडशतकी मजल मारली आहे. २०१८ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धत लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या हॉंगकाँगच्या फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजाची दमछाक झाली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार कामगिरी करत २५ व्या षटकातच १५० धावांचा टप्पा गाठला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात संथ झाली होती. दुसऱ्याच षटकात भारताने आपला एकमेव रिव्ह्यू गमावला. त्यानंतर शिखर धवनने फिंचचा तुलनेने सोपा दिसणारा झेल सोडला. पण त्यानंतर सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी १०व्या षटकात अर्धशतक तर १७व्या षटकात शतकी सलामी दिली. कर्णधार फिंचने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाचे शतक गाठले. कर्णधार फिंचपाठोपाठ उस्मान ख्वाजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने धुलाई सुरु ठेवत २५ व्या षटकात १५० धावा केल्या. या बरोबरच भारताविरुद्ध गेल्या वर्षभरात १५० धावांची सलामी देणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला.

दरम्यान, आजचा सामना रांची येथे खेळण्यात येत आहे. त्यामुळे ‘लोकल बॉय’ महेंद्रसिंग धोनी याच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताने संघात बदल केलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलच्या जागी संघात झाय रिचर्डसनला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी वाढवून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर मालिका वाचवण्याची शेवटची आशा म्हणून सामना जिंकण्यासाठी पाहुणा संघ मैदानावर सज्ज आहे.