IND Vs AUS 3rd Test Updates in Marathi: गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा करत मोठी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा भारतीय संघ पहिल्याच डावात मागे पडला आहे. कांगारू संघाने ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहशिवाय भारताचे इतर गोलंदाज आपली भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरले. गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ४४५ धावांवर सर्वबाद केले.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय तितकासा योग्य ठरला नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारत धावा करून भारताला बॅकफूटवर टाकले. मात्र, पावसामुळे पहिल्या दिवशी फारसा खेळ होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया १३.२ षटकात २८ धावा करून ड्रेसिंग रूममध्ये परतला. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर स्मिथ आणि हेड भारतासाठी डोकेदुखी ठरले. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. दोन्ही फलंदाजांनी शतकं झळकावली आणि २४१ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची कसोटीतील ही चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली. हेडने १६० चेंडूंचा सामना करत १८ चौकारांच्या मदतीने १५२ धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने १९० चेंडूत १२ चौकार लगावत १०१ धावा केल्या. स्मिथचे हे ३३वे कसोटी शतक होते. तो आता ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
मधल्या फळीनंतर ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाज ॲलेक्स कॅरीनेही धावा केल्या. कॅरीने ८८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावा केल्या होत्या. त्याच्यासह कर्णधार पॅट कमिन्स (२०) आणि मिचेल स्टार्क (१८) यांनीही फलंदाजी करताना चांगली खेळी केली. ११७.१ षटकांत फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ४४५ धावांवर सर्वबाद झाला.
हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान
जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ६ विकेट्स घेत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्यात मदत केली. कांगारू संघाच्या सलामीवीरांना बाद केल्यानंतर बुमराहने शतक झळकावत मोठी धावसंख्या उभारत असलेल्या स्मिथ आणि हेडला बाद केलं. यानंतर मार्शला बाद करत त्याने ५ विकेट्सचा टप्पा गाठला. तर तिसऱ्या दिवशी स्टार्कला बाद करत ६ विकेट्स पूर्ण केल्या. बुमराहशिवाय सिराजने २ तर आकाशदीप आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.