भारताविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात कोहलीला स्लेजिंगला सामोरे जावे लागले.
भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात लक्षवेधी ठरत आहे. चेंडू कुरतडल्याचे प्रकरण झाल्यापासून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरी कोहलीबरोबर स्लेजिंग करत नसले, तरी ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी तिसऱ्या दिवशी कोहलीला चिडवल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात कोहलीने ६९२ धावा तडकवल्या होत्या. पण या दौऱ्यात दोनही डावात त्याला अर्धशतकही करता आले नाही. पहिल्या डावात तो ३ धावांवर बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो ३४ धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ज्यावेळी बाद होत होते, तेव्हा कोहलीने मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केल्याचे दिसले. त्यामुळे मग कोहली जेव्हा शनिवारी बाद झाला, तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी कोहलीची चिडवले आणि त्याची टिंगल उडवली.
दरम्यान, आता भारताला विजयासाठी ६ बळींची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचा केवळ एका दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामन्यात रंगत आली आहे.