भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला अखेर दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिंच हा फलंदाजीसाठी तंदुरुस्त असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. दुसऱ्या डावात चहापानाआधी ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला होता. फिंच फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे तो फलंदाजी करणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. पण तो तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या फिंचने दुसऱ्या डावही चांगली सुरुवात करत ३० चेंडूत २५ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या १३ व्या षटकात फिंचच्या बोटाला दुखापत झाली. शमीने टाकलेला चेंडू अधिक उसळी घेऊन फिंचच्या बोटाला लागला आणि बोटातून रक्तस्त्राव सुरु झाला होता.

 

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केली होती. भारताचा पहिला डाव २८३ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानावर आले आणि त्यांनी चहापानापर्यंत बिनबाद ३३ पर्यंत मजल मारली. त्यावेळी फिंचला दुखापत झाली होती.

Story img Loader