India vs Australia: आता एकदिवसीय विश्वचषकाला एक महिना बाकी आहे. याआधी सर्व संघ आपापल्या संघांना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी नुकताच संघ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ सदस्यीय संघ निवडला होता आणि यापैकी १५ सदस्यीय संघ विश्वचषकासाठी निवडला जाईल असे सांगितले होते. मात्र, आता ऑस्ट्रेलियाला काही मोठे धक्के बसले आहेत. त्यांचे चार खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत. भारताविरुद्धची मालिका खेळण्याबाबत सस्पेंस आहे. अशा परिस्थितीत त्याचे विश्वचषकातील खेळणेही साशंक आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स, उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे.
स्मिथ आणि कमिन्सचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या मांडीला दुखापत झाली असून तो देखील सध्या उपचार घेत आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज मॅक्सवेल घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यात आता एक मोठी बातमी आली आहे की मॅक्सवेल विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून दक्षिण आफ्रिकेबरोबरच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. डाव्या घोट्यात दुखू लागल्याने मॅक्सवेल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला. गेल्या वर्षी याच पायाला दुखापत झाली होती. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, “मला भारताविरुद्धच्या मालिकेतील काही सामने खेळायचे आहेत.”
विश्वचषक स्पर्धेपूर्वी २२ सप्टेंबरपासून मोहाली येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी मॅक्सवेल म्हणाला, “निवडकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी मला चांगला सपोर्ट केला आहे. भारतीय दौऱ्यापर्यंत सावरण्यासाठी ते माझ्यावर जास्त दबाव टाकू इच्छित नाही कारण, त्यांना माहित आहे की विश्वचषकापूर्वी त्यांच्याकडे मला निवडण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यामुळेच घाई करण्याऐवजी, मला स्वतःला अतिरिक्त वेळ द्यायचा आहे. मी विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकतो याची त्यांना खात्री करून घ्यायची आहे.”
सर्व संघांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांचे १५ सदस्यीय संघ आयसीसीकडे सोपवावे लागेल. संघात बदल करण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर आहे. ३४ वर्षीय मॅक्सवेल, ज्याचा गेल्या नोव्हेंबरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत पाय मोडला होता, त्याच्या डाव्या पायात अजूनही धातूची प्लेट आहे. संघाच्या पहिल्या सराव सत्रानंतर घोट्याला दुखापत झाल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेतून लवकर घरी जावे लागले. मॅक्सवेल पुढे म्हणाला, “सराव सत्रापर्यंत सर्व काही ठीक होते. त्यानंतर मला वाटले की माझ्या घोट्याच्या आजूबाजूच्या नसाला थोडी सूज आली आहे. आणि ती वाढत चालली होती त्यामुळे मला वेदना होत होत्या. यावर आता उपचार सुरु असून लवकरच मी बरा होईन, अशी आशा व्यक्त करतो.”