IND vs AUS 4th Test Ravi Shastri on Sam Konstas : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कोन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. सॅम कोन्स्टास सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. या खेळाडूने ६५ चेंडूत ६० धावांची खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले. या शानदार खेळीनंतर सॅम कोन्स्टासला रवींद्र जडेजाने बाद केले. मात्र, आता माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांनी सॅम कॉन्स्टासबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी शास्त्रींनी सॅमची तुलना केली सेहवागशी –

रवी शास्त्री यांनी सॅम कॉन्स्टन्सची तुलना भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागशी केली आहे. रवी शास्त्री मानतात की सॅम कॉन्स्टन्सची बॅट ज्या प्रकारे स्विंग करते, ती वीरेंद्र सेहवागशी मिळतेजुळते आहे. तो ऑस्ट्रेलियाचा भावी सेहवाग ठरेल. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्री यांनी कॉन्स्टासच्या निर्भय स्ट्रोक खेळण्याचे कौतुक केले आणि त्याची तुलना सेहवागच्या स्फोटक शैलीशी केली. शास्त्री म्हणाले, “त्याला प्रसंगी काही अपयश येईल, पण जेव्हा तो लयीत येतो तेव्हा तो मनोरंजनासाठी तयार असतो.”

माजी भारतीय प्रशिक्षक म्हणाले की, बॉलर्सवर वर्चस्व गाजवण्याची आणि त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या संधींचा फायदा घेण्याची कॉन्स्टसची क्षमता सेहवागच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाल्यापासून त्याच्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे. रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटत नाही की जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टन्सने जशी फलंदाजी केली, तशी कोणत्या फलंदाजांने केली असेल. सॅम कॉन्स्टासने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. मात्र, सॅम कॉन्स्टासच्या डावाच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना संधी निश्चितच मिळाली होती, पण त्याचा फायदा उठवण्यात ते अपयशी ठरले. यानंतर सॅम कॉन्स्टासने भारतीय गोलंदाजांना फारशी संधी दिली नाही.”

हेही वाचा – IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

जस्टिन लँगरकडून सॅम कॉन्स्टासचे कौतुक –

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर जस्टिन लँगरने सॅम कॉन्स्टासचे खूप कौतुक केले. जस्टिन लँगर म्हणाला की, “सॅम कॉन्स्टासला जसप्रीत बुमराहविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची लायन्सस देण्यात आली होती. हे सोपे नसले तरी या युवा फलंदाजाने ते करून दाखवले. कसोटी क्रिकेट सोडा, टी-२० फॉरमॅटमध्ये पण जसप्रीत बुमराहची इकॉनॉमी उत्कृष्ट आहे. या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नाही, पण या युवा खेळाडूने धैर्य दाखवले. या युवा फलंदाजाची फलंदाजी पाहणे खूप छान वाटत होते.”

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत उभारला धावांचा डोंगर, भारतीय गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे; टॉप ऑर्डरनेच केल्या ३५० धावा

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव –

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४७४ धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यानंतर स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३११ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. मात्र, चार विकेट्ससाठी भारतीय गोलंदाजांना आज कसरत करावी लागली. ऑस्ट्रेलियाने आज १६३ धावा जोडल्या आणि चार विकेट्स गमावल्या. स्मिथ १४० धावा करून बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. आकाश दीपने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus boxing day test ravi shastri says sam konstas reminds me a lot of virender sehwag vbm