IND vs AUS 4th Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया कठीण परिस्थितीत सापडते, तेव्हा भारतीय कर्णधार बुमराहकडे मदतीसाठी वळतो. बुमराहने गेल्या काही वर्षांत आपल्या अचूक यॉर्करने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध षटकार मारण्यासाठी फलंदाज धाडस करत नाहीत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात युवा खेळाडूने बुमराहच्या षटकात षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. अशा प्रकारे ४४८३ चेंडूंनंतर बुमराहविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. सॅम कॉन्स्टास भारताविरुद्ध उस्मान ख्वाजासह सलामीला आला. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमराहची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याने बुमराहविरुद्ध ऐतिहासिक षटकार ठोकला. विशेष बाब म्हणजे बुमराहविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ११४५ दिवसानंतर आणि ४४८३ चेंडूंनंचक षटकार ठोकला आहे.
यापूर्वी २०२१ मध्ये कॅमेरून ग्रीनने सिडनीमध्ये त्याच्याविरुद्ध षटकार ठोकला होता. कॉन्टासने सामन्याच्या सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला. सॅम कॉन्स्टास इतक्यावरच थांबला नाही. त्याने बुमराहविरुद्ध आणखी एक षटकार ठोकला. दहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. ज्यामुळे तो जसप्रीत बुमराहविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन षटकार मारणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त जोस बटलरने (२०१६) अशी कामगिरी केली होती.
सॅम कॉन्स्टासने लगावले दोन षटकार –
या सामन्यात सॅम कॉन्स्टासने स्फोटक फलंदाजी केली. पहिल्या १८ चेंडूत त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा आल्या होत्या. यानंतर तो जसप्रीत बुमराहविरुद्ध आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. बुमराहच्या चौथ्या षटकात कोन्स्टासने पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. या षटकात एकूण १४ धावा झाल्या. अकराव्या षटकात त्याने बुमराहविरुद्ध १८ धावा काढल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
सॅम कॉन्स्टासने झळकावले अर्धशतक –
सॅम कॉन्स्टास त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खूप आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला. ज्यामध्ये त्याने या मालिकेत आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकले. सॅमने टी-२० क्रिकेट शैलीत फलंदाजी केली आणि धावांचा वेग उंचावत ठेवण्याचे काम केले. सॅम कॉन्स्टासने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या ५२ चेंडूत पूर्ण केले. तो ६५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला.