IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर नॅथन मॅकस्विनीच्या जागी १९ वर्षीय सॅम कोन्स्टासने पदार्पण केले. जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. दरम्यान या सामन्यात पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास आणि अनुभवी खेळाडू विराट कोहली यांच्यात बाचाबाची पाहिला मिळाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि कॉन्स्टास यांच्यात झाली बाचाबाची –
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण तापले. सॅम कॉन्स्टास आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. खेळपट्टीच्या मध्यभागी कोहली आणि कोन्स्टॅस यांची टक्कर झाली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासह पंचांना हस्तक्षेप करावा लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात सॅम कॉन्स्टासने स्फोटक फलंदाजी केली. पहिल्या १८ चेंडूत त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा आल्या होत्या. यानंतर तो जसप्रीत बुमराहविरुद्ध आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. बुमराहच्या चौथ्या षटकात कोन्स्टासने पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. या षटकात एकूण १४ धावा झाल्या. अकराव्या षटकात त्याने बुमराहविरुद्ध १८ धावा काढल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
हेही वाचा – IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय? ज्यामध्ये आतापर्यंत टीम इंडियाची कशी राहिलेय कामगिरी? जाणून घ्या
ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम ठरला दुसरा सर्वात तरुण खेळाडू –
सॅम कॉन्स्टास त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खूप आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला. ज्यामध्ये त्याने या मालिकेत आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकले. सॅमने टी-२० क्रिकेट शैलीत फलंदाजी केली आणि धावांचा वेग उंचावत ठेवण्याचे काम केले. सॅम कॉन्स्टासने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या ५२ चेंडूत पूर्ण केले. तो ६५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला.