IND vs AUS Cameron Green rulled out Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. पण याआधीच ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. ग्रीनने यापूर्वी चांगली कामगिरी करत संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले होते. ज्यामुळे कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली –
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली होती. यानंतर, स्कॅनमध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आणि आता त्याने पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय निवडला आहे. आता त्याला बरे होण्यासाठी किमान ६ महिने लागतील. याच कारणामुळे तो भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानच्या भूमीवर होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रलियाला कॅमेरूनची उणीव भासणार –
कॅमेरून ग्रीनला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून बाहेर पडाव लागल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण ग्रीन हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि मधल्या फळीत दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव नक्की भासेल. ग्रीनला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सारखीच दुखापत झाली आहे.
हेही वाचा – MUM vs BAR : मुंबईने बडोद्याविरुद्ध टेकले गुडघे; सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभव
कॅमेरून ग्रीनची कारकीर्द –
कॅमेरून ग्रीनने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी २८ कसोटी सामन्यांमध्ये १३७७ धावा आणि ३५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन शतके आणि ६ अर्धशतकेही झळकावली आहेत. ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी २८ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.