ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने झुंजार खेळी करत शतक झळकावले. प्रथम उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर आणि त्यानंतर नवोदित हनुमा विहारीबरोबर भागीदारी करत कोहलीने ही कामगिरी केली. हे कोहलीचे कसोटी कारकिर्दीतील २५ वे शतक ठरले. या शतकी खेळीत त्याने ११ चौकार लगावले.

या खेळीबरोबरच विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने आपली २५ शतके पूर्ण करण्यासाठी १२७ डाव खेळले. हा मैलाचा दगड गाठण्यासाठी सचिनला मात्र १३० डाव खेळावे लागले होते.

दरम्यान, हे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ वे तर ऑस्ट्रेलियातील ६वे शतक ठरले आहे.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच (५०), हॅरिस (७०) आणि हेड (५८) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यास प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत भारताने ३ बाद १७२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. आज दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी रहाणे बाद झाला. पण कोहलीने विहारीच्या साथीने आपली झुंज सुरु ठेवली.

Story img Loader