India vs Australia, T20 series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताने सोमवारी (२० नोव्हेंबर) आपला संघ जाहीर केला. विश्वचषक फायनलनंतर अवघ्या ४ दिवसांनी ही टी२० मालिका सुरू होत आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सूर्यकुमार यादवची टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. भारताने या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा वगळता विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
टी२० मालिकेत चहलची निवड न झाल्याने त्याने सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर
ज्या दोन खेळाडूंची टी२० मालिकेसाठी निवड न झाल्याची चर्चा आहे, त्यात संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहलने या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून शेवटचा टी२० सामना खेळला होता. भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत निवड न झाल्याने युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. भारतीय संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर एक स्मायली इमोजी शेअर केला आहे.
यापूर्वीही युजवेंद्र चहलची विश्वचषक संघातही निवड झाली नव्हती. या लेगस्पिनरने जानेवारी २०२३ मध्ये शेवटचा वन डे खेळला होता. यानंतर, तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा भाग होता, परंतु एकही सामना खेळू शकला नाही कारण, संघ व्यवस्थापनाने रिस्ट स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव तसेच फिंगर स्पिनर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना पहिले प्राधान्य दिले.
दुखापतीमुळे विश्वचषक खेळू न शकलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियात परतला आहे. लेगब्रेक गोलंदाज रवी बिश्नोई आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषकातून युजवेंद्र चहलचा पत्ता कट झाला आहे का, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. बीसीसीआय याबाबत नक्की काय विचार करत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चहलने टीम इंडियातील आपल्या अनुपस्थितीचा फायदा घेतला आणि सप्टेंबरमध्ये कौंटी चॅम्पियनशिपमध्ये केंटसाठी कसोटी सामने खेळला. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी२० मध्येही तो हरियाणाकडून खेळला आणि त्याने ७ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या. तसेच, त्याच मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने उत्तर प्रदेशकडून खेळताना ७ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या, त्याची देखील टी२० मालिकेसाठी निवड झाली नाही. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा टी२० संघ जाहीर, सूर्यकुमार यादव असेल कर्णधार)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा टी२० संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी२०: २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरा टी२०: २६ नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम
तिसरा टी२०: २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा टी२०: १ डिसेंबर, रायपूर
पाचवा टी२०: ३ डिसेंबर, बंगळुरू