ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी मजल मारली. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत या सामन्यातही शतक ठोकले. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल मारता आली. या सामन्यात पुजारा मालिकेतील तिसरे शतक ठोकत एक विक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एका कसोटी मालिकेत ३ शतक झळकावणारा पुजारा हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

या मालिकेत पुजाराने पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात शतक ठोकले. या बरोबरच पुजाराने दिग्गज कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यांनी १९७७-७८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वप्रथम एकाच मालिकेत ३ शतके ठोकली होती. तर २०१४-१५ च्या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकच मालिकेत तीन शतके ठोकली होती. त्यानंतर मालिकेत ३ शतके ठोकणारा पुजारा हा तिसरा फलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात पुजाराने शानदार शतक ठोकले. त्या सामन्यात त्याने १२३ धावांची खेळी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला फारसा प्रभावी खेळ करता आला नाही. पण तिसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केले आणि १०६ धावांची खेळी केली. तर सध्या सुरु असलेल्या कसोटीमध्ये तो १३० धावांवर नाबाद आहे.

याशिवाय नवोदित मयंक अग्रवालनेही ७७ धावांची शानदार खेळी करत आपली निवड पुन्हा एकदा सार्थ ठरवली.

Story img Loader