भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात त्याच्या आक्रमक स्वभावामुळे प्रत्येक मालिकेत चर्चेचा विषय बनतो. या दौऱ्यातली दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम पेनसोबत कोहलीचं रंगलेलं द्वंद्व चांगलंच रंगलं. यावरुन अनेक माजी भारतीय खेळाडूंनी विराटवर टीकेची झोडही उठवली. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी विराटच्या या आक्रमक स्वभावाचं कौतुक केलंय.
“आपल्या संघातील गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर इतक्या जोरदार पद्धतीने सेलिब्रेशन करणारा खेळाडू मी तरी पाहिलेला नाहीये. एका अर्थाने असं वागणं चांगलं आहे. त्याच्या मैदानातील वागण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द दिसून येते. सध्या भारतीय संघ परदेश दौऱ्यावर पहिला मालिका विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. तुम्ही जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम स्थानी असताना, ते स्थान कायम राखण्यासाठी केलेली धडपड ही अयोग्य ठरवता येणार नाही.” Fox Cricket वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉर्डर यांनी कोहलीची बाजू घेतली.
२०१८ सालात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका व त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका गमावली आहे. आपल्या संघाला सर्वोत्तम संघ बनवणं ही एक वेगळी बाब आहे, कोहलीने आपल्या काळात हे साध्य करुन दाखवलंय. मात्र परदेशात आपल्या संघाला पहिला मालिका विजय मिळवून देणं हे देखील कोणत्याही कर्णधारासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे मैदानात एखाद्या घटनेनंतर कोहलीचं आक्रमक होणं हा त्याच्या स्वभावाचाच भाग असल्याचंही बॉर्डर म्हणाले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना २६ डिसेंबर मेलबर्न येथे सुरु होणार आहे.