India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९९ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० अशी खिशात घातली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाच गड्यांच्या बदल्यात ३९९ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु, पावसाचा अडथळा आल्यामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २८.२ षटकांत २१७ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना ९९ धावांनी जिंकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शतकवीर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या सामन्याचे हिरो ठरले. तरी या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीदेखील उत्कृष्ट कामगिरी केली. मोठ्या कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने या सामन्यात ३ गडी बाद करत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो हे दाखवून दिलं. या सामन्यात अश्विन गोलंदाजी करत असताना एक मजेदार घटना घडली.

खरंतर रवीचंद्रन अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. भलेभले डावखुरे फलंदाज अश्विनसमोर नांगी टाकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नर हा रवीचंद्रन अश्विनचा ठरलेला बकरा आहे. कसोटीसह टी-२० क्रिकेटमध्ये अश्विनने वॉर्नरला अनेकदा बाद केलं आहे. त्यामुळे उभय संघांमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी अश्विन गोलंदाजीला आल्यावर वॉर्नरने एक युक्ती लढवली. वॉर्नर अश्विनविरोधात उजव्या हाताने फलंदाजी करू लागला. वॉर्नरने अश्विनच्या एका कॅरम बॉलवर उजव्या हाताने शानदार चौकारही लगावला. वॉर्नरच्या चौकाराला त्याच्या संघसहकाऱ्यांसह सर्वांनीच दाद दिली. परंतु, वॉर्नरचा हा आनंद अश्विनने फार काळ टिकू दिला नाही. कारण, त्याच षटकात अश्विनने वॉर्नरला बाद केलं.

हे ही वाचा >> चिनी प्रेक्षकांच्या मते क्रिकेट म्हणजे रन्स नव्हे, पॉइंट्स..विकेट्स नव्हे, आऊट्स आणि (स्मृती) मानधना देवी; एशियन गेम्समधील सामन्यावर भन्नाट प्रतिक्रिया!

अश्विनच्या कॅरम बॉलवर वॉर्नरने रिव्हर्स स्वीप शॉट लगावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू वॉर्नरच्या पायावर जाऊन आदळला. भारतीय खेळाडूंनी पंचांकडे अपील केलं आणि पंचांनी वॉर्नरला बाद घोषित केलं. त्यानंतर वॉर्नरने त्याचा सहकारी जॉश इंग्लिस याच्याशी सल्लामसलत केली आणि माघारी परतला. वॉर्नरने डीआरएस घेतला असता तर कदाचित तो बाद झाला नसता. कारण, चेंडू वॉर्नरच्या बॅटला लागून पायाला लागला होता. परंतु, वॉर्नरला ते जाणवलं नसेल. त्यामुळेच त्याने डीआरएस घेतला नसावा. परंतु, रवीचंद्रन अश्विनसमोर वॉर्नरचा उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus david warner bats with right hand against ravichandran ashwin gets lbw watch video asc