चेंडू कुरतडल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील खेळाडूंच्या संघटनेने त्यांच्यावरील बंदी भारताविरुद्धच्या दौऱयापूर्वी उठवावी, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने फेटाळली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने बंदी घातली. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली. मात्र त्यांना त्यांच्या चुकीबद्दल पुरेशी शिक्षा मिळाली असून आता त्यांच्यावरील बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूच्या संघटनेने केली होती. मात्र त्यांच्यावरील बंदी कमी करण्यासारखे काहीही घडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली असल्याचे बोर्डाच्या संचालक मंडळाने एकमताने ठरवले आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्टेलियाने केलेल्या कारवाईला बंदी घातलेल्या कोणत्याही खेळाडूने आव्हान दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी उठवू नये, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने व्यक्त केले होते. आजच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे भारताच्या मालिकेआधी बंदी उठवण्याबाबतच्या या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.