India vs Australia World Cup Final 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्याचवेळी टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दशकभराचा दुष्काळ संपवण्यास मुकली. संपूर्ण स्पर्धेत भारताने चमकदार खेळ केला आणि अपराजित राहून अंतिम फेरी गाठली होती, परंतु विजेतेपदाच्या सामन्यातील पराभवाने सर्व चाहत्यांची तसेच खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे.
भारताच्या पराभवानंतर सर्व खेळाडू निराश झाले. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. रोहित पटकन ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह सिराजला शांत करताना दिसला. या पराभवानंतर विराट कोहलीही खूप निराश दिसत होता. खेळाडूंच्या पत्नी आणि चाहत्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने भारतीय संघाचे सांत्वन करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट्स गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १४१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाचा शेवटचा पराभव २००३ मध्ये झाला होता.
कोहली आणि राहुलने अर्धशतके झळकावली
तत्पूर्वी, भारताकडून के.एल. राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा ९, मोहम्मद शमी ६, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल प्रत्येकी ४ धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
विश्वचषकात भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलआऊट झाला
भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. या विश्वचषकात भारत पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आणि सामनाही हरला.