Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यादा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकवले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या आणि अंतिम सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या अगोदर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाने २००३ मध्ये भारताचा पराभव केला होता.
तत्पूर्वी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.
भारताने पहिल्या १० षटकांत ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक नियोजनासह शानदार गोलंदाजी केली