Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिऱ्यांदा विश्वविजेते होण्याची संधी गमावली आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून पराभव झाला. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची भारताला संधी होती, पण रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला ते करता आले नाही. या विश्वचषकात भारताने सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११वा सामना जिंकू शकला नाही. भारताच्या पराभवाला संघाचे आणि कर्णधाराचे अनेक निर्णय कारणीभूत होते. ते कोणते होते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्याच्या जागी जडेजाला फलंदाजीसाठी पाठवले –

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली होती, पण गिल आणि श्रेयस अपयशी ठरल्यावर राहुल आणि कोहलीने डावाची धुरा सांभाळली. विराट बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येणार होता, पण रोहितने फलंदाजीचा क्रम बदलून जडेजाला फलंदाजीसाठी पाठवले. त्याचा डाव संघावर उलटला. २२ चेंडूत ९ धावा करून जडेजा बाद झाला. त्यामुळे राहुलवरील दडपणही वाढले आणि भारताच्या धावगती मंदावली. यानंतर सूर्यकुमार फलंदाजीला आला तेव्हा त्याला साथ देणारे कोणी नव्हते. त्याने शेवटपर्यंत सावध खेळ केला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शेवटी तो बाद झाला. त्याने २८ चेंडूत १८ धावा केल्या. रोहितच्या या निर्णयामुळे सूर्यकुमार आणि जडेजा या दोघांची फलंदाजी फ्लॉप ठरली.

हेही वाचा – IND vs AUS Final Highlights, World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया ठरला सहाव्यांदा विश्वविजेता! भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले

मोहम्मद शमीकडे नवीन चेंडू सोपवण्यात आला –

जेव्हा भारतीय संघ २४० धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा रोहित शर्माने दुसरा नवा चेंडू मोहम्मद शमीकडे सोपवला. शमीने संपूर्ण विश्वचषकात थोड्या जुन्या चेंडूनी गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याचा हलकासा स्विंग होत होता आणि फलंदाजांना त्याला खेळणे कठीण जात होते. तो सतत विकेट घेत होता. अंतिम फेरीत शमीला अचानक नवीन चेंडू मिळाला, तेव्हा तो स्विंग करु शकला नाही. तो त्याच्या लेन्थवरुन विचलित होत राहिला आणि तो खूप महागडा ठरला. याच कारणामुळे त्याने विकेट घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघावर कोणतेही दडपण आले नव्हते.

वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिराजवर विश्वास दाखवला नाही –

या सामन्यात रोहित शर्माने आपला महत्त्वाचा गोलंदाज मोहम्मद सिराजवर विश्वास दाखवला नाही. सिराज २०२२ पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने नवीन चेंडूने चांगली कामगिरी केली असून सध्या तो आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. असे असूनही रोहितने त्याच्यावर अजिबात विश्वास दाखवला नाही. त्याला सगळ्यात शेवटी गोलंदाजीसाठी आणण्यात आले. जुन्या चेंडूमुळे सिराज पॉवरप्लेमध्ये जे चमत्कार करतो ते करू शकला नाही. त्याचबरोबर संघासाठी महत्त्वाचा खेळाडू होण्याऐवजी तो अंतिम फेरीत ओझे ठरला.

हेही वााचा – IND vs AUS Final, World Cup 2023: ऑस्ट्रेलिया विश्वविजेते; ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी

क्षेत्ररक्षण लावण्यात केली चूक –

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी उत्कृष्ट भागीदारी करत सामना भारताच्या पकडीतून घेतला. २४० धावांचा बचाव करताना एक गोष्ट स्पष्ट झाली की ऑस्ट्रेलियन संघाला बाद करूनच या धावसंख्येचा बचाव करता आला असता. तसेच कांगारू संघाला बाद करण्याची ताकद भारतीय गोलंदाजांमध्येही होती. अशा स्थितीत कर्णधार रोहितने आक्रमक क्षेत्ररक्षण सेट केले नाही. दोन वेळा असे घडले की जेव्हा चेंडू हेड आणि लाबुशेन या दोघांच्याही बॅटच्या काठावर लागून स्लिपमधून गेला, परंतु तेथे क्षेत्ररक्षक नव्हता. याच कारणामुळे ही भागीदारी तुटली तेव्हा सामना संपला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus final updates which of rohit sharmas decisions led to indias defeat in the world cup final 2023 vbm
Show comments