IND vs AUS Gabba Test Last 4 Days Time Changes: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबर म्हणजे आजासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर सुरू झाला आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ढगाळ स्थिती पाहून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या सत्रात १३.२ षटके टाकल्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. पहिल्या दिवस वाया गेल्यानंतर पंचांनी आता या सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांच्या सुरुवातीच्या वेळेत बदल जाहीर केले आहेत.
गाबा कसोटी सामन्यात पावसाची शक्यता सामन्यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. पण नाणेफेक वेळेवर होऊन सामनाही वेळेवर सुरू झाला. पण सामना सुरू झाल्यानंतर हवामान अंदाजाचा परिणाम पहिल्या दिवसाच्या खेळावर दिसून आला. पावसामुळे पंचांना पहिल्या सत्रात दोनदा खेळ थांबवावा लागला. ज्यामध्ये पहिल्या वेळी काही वेळाने पुन्हा खेळ सुरू झाला, मात्र दुसऱ्या वेळी पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेपूर्वीच संपला.
हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?
आता गाबा कसोटी सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांत एकूण ९८ षटकं टाकली जातील, ज्यामध्ये सामना निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी सुरू होईल. बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली आहे की पुढील चार दिवसांचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे ५:२० वाजता सुरू होईल, जो पूर्वी पहाटे ५:५० वाजता सुरू होणार होता.
हेही वाचा – D Gukesh: गुकेशच्या विश्वविजेतेपदाने रशियाला पोटशूळ; डिंग लिरेनवर केला मुद्दाम हरल्याचा आरोप
गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी किती धावा केल्या?
ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या १३.२ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने एकही विकेट न गमावता २८ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये उस्मान ख्वाजा १९ आणि नॅथन मॅकस्वीनी ४ धावांवर नाबाद फलंदाजी करत होते. तर अपक्षेप्रमाणे गाबाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना स्विंग मिळाला नाही. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यात हर्षित राणा आणि रविचंद्रन अश्विनच्या जागी आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेजलवूड परतला आहे.