IND vs AUS Hardik Pandya: आशिया चषकातुन हातातोंडाशी आलेला विजय गमावून बाहेर पडलेली मेन इन ब्ल्यूची टीम आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगलीच कसर भरून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र २० सप्टेंबरला ऑस्ट्रेलियेसमोरही रोहित शर्माचा संघ कमकुवत दिसून आला. हार्दिक पंड्याने जोर लावूनही कालचा सामना भारताच्या पगड्यात आला नाही परिणामी आता संघाला अनेक दिगज्जांकडून सुनावले जात आहे. अशातच आयसीसी विश्वचषक सुद्धा काहीच आठवड्यांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे टीम इंडियाच्या बांधणीत नेमकं चुकतंय काय असा प्रश्न केला जात आहे. टीम इंडियाच्या वारंवार होणाऱ्या पराभवाचा दोष कोणाचा यावर हार्दिक पंड्याने स्पष्ट उत्तर दिले आहे.
(ऑस्ट्रलियाच खरे विश्वविजेते! २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय संघाचा चार गडी राखून पराभव)
मंगळवारी, मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. फलंदाजांनी चोख कामगिरी केली असली तरी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीबाबत बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयत्या वेळी सोडलेले झेल गोलंदाजांना चांगलेच महागात पडले. शेवटच्या चार षटकांमध्ये २५ चेंडूंमध्ये ४५ धावा करून मॅथ्यू वेडने भारतीय गोलंदाजांची दाणदाण उडवली.
जसप्रीत बुमराहची दुखापत कितपत गंभीर रोहित शर्माने अंतिम अकरामध्ये न घेतल्याने चर्चांना आले उधाण..
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान, हार्दिक पंड्याला पत्रकारांनी कोणाची चूक झाली असे विचारले असता हार्दिकने स्पष्ट उत्तर देत पत्रकाराची बोलती बंद केली. ‘माझा सध्या चांगला फॉर्म आहे, पण खेळ अजून चांगला होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात माझी कामगिरी चांगली होती पण आता पुढील सामन्यात ते मला लक्ष्य करू शकतात आणि मला एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे, असं पंड्याने सांगितलं.
पुढे पंड्या म्हणाला की, आपल्या अपयशाचं कारण सर्वांचा खेळ असू शकतो, कोण्या एकाला दोष देता कामा नये. जर असा कोणी एक खेळाडू दोषी असता तर त्याला आधीच खेळण्यापासून थांबवले असते. पण असा एकाचा दोष नाही. पंड्या पुढे म्हणाला की एकूण संघाचा खेळ सुधारला पाहिजे आणि मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये आम्ही जोरदार पुनरागमन करू असेही वचन पंड्याने दिले.
दरम्यान कालच्या सामन्यात पंड्याने फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी गोलंदाजी करताना तो फिका दिसत होता. मोहालीचे स्टेडियम फलंदाजांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले. कालच्या सामन्यात भारतासाठी जमेची बाजू अक्षर पटेल ठरला होता. या फिरकीपटू त्याच्या चार षटकांमध्ये फक्त १७ धावा देत तीन बळी मिळवले.