India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संपन्न झाला. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाने आपली तयारी किती पक्की आहे हे आजच्या विजयाने दाखवून दिले. भारताने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. या विजयाने टीम इंडिया वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेली आहे. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाचवेळी अव्वल स्थान पटकावून भारताने एक इतिहास रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २७७ धावांचा पाठलाग करताना भारताने अफलातून सुरुवात केली. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी १४२ धावांची भक्कम भागीदारी करत विजयाचा पाया रचला. दोघेही शतकापासून जरी वंचित राहिले असले तरी त्यांच्या या शानदार भागीदारीमुळेच भारत कांगारुंना मात देऊ शकला. ते दोघे बाद झाल्यानंतर ऑसीने सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. त्यांनी एकापाठोपाठ एक असे भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत माघारी धाडले. मात्र, कर्णधार के.एल. राहुलने कॅप्टन इनिंग खेळत आधी इशान किशन आणि नंतर सूर्यकुमार यादवला हाताशी घेत भारताला विजय मिळवून दिला. या विजयाने मालिकेत टीम इंडिया १-०ने आघाडीवर आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ५२, जोश इंग्लिसने ४५ आणि स्टीव्ह स्मिथने ४१ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी १४२ धावा जोडल्या. ऋतुराजने ७१ धावांची तर शुबमन गिलने ७४ धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. कर्णधार के.एल. राहुलने ५८ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने ४९व्या षटकात शॉन अ‍ॅबॉटला षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: ODI World Cup Jersey: ऑस्ट्रेलियन क्रिकेटने टॉप २० वर्ल्डकप जर्सी केल्या जाहीर, टीम इंडियाच्या दोन जर्सीचा समावेश

भारताने १९९६ नंतर म्हणजेच २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. १९९६ नंतर आता भारतीय संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने मागील चार एकदिवसीय सामने जिंकले होते. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना २४ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus highlights india defeated australia by five wickets in the first odi rahul won with a six avw