यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर पाच वेळा जगज्जेतेपदाला गवसणी घातलेल्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. मात्र, दोन्ही संघांची तुलना करता व ऑस्ट्रेलियाला पहिल्या फेरीत भारतानं पराभूत केल्यानंतर अंतिम सामन्यात विजयासाठी भारतालाच सर्वाधिक पसंती दिली जात आहे. भारताच्या या कामगिरीमध्ये सर्वच खेळाडूंचा महत्त्वाचा हातभार राहिला आहे. त्यामुळेच आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या Player of the Tournament च्या यादीमध्ये तब्बल चार भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. यातील एका खेळाडूला अंतिम सामन्यानंतर मालिकावीराचा खिताब देऊन गौरवण्यात येईल.
नऊ खेळाडूंचा समावेश
आयसीसीनं जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये वेगवेगळ्या देशांचे एकूण ९ खेळाडू असून त्यात चार खेळाडू फक्त भारताचे आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन तर दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला स्थान मिळालं आहे. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमरा ही चार नावं आहेत. तर उरलेल्या पाच खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल-अॅडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया), रचिन रवींद्र-डॅरिल मिचेल (न्यूझीलंड) व दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकचा समावेश आहे.
Ind vs Aus Final: विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर; पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज!
फलंदाजांचा तुफान फॉर्म!
दरम्यान, या नऊ खेळाडूंमधील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहेत. नऊपैकी सहा फलंदाज आहेत. या विश्वचषकात या फलंदाजांनी धावांची अक्षरश: लयलूट केली आहे. अंतिम सामन्यातील धावा वगळता विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक ७११ धावा, क्विंटन डिकॉकच्या नावे ५९४ धावा, रचिन रवींद्रच्या नावे ५७८ धावा, डॅरिल मिचेलच्या नावे ५५२ धावा तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे ५५० धावा आहेत. यातलं सहावं नाव ग्लेन मॅक्सवेलचं आहे. मात्र, त्याच्या नावे आठ सामन्यांमधून अवघ्या ३३८ धावा आहेत. पण मोक्याच्या क्षणी त्यानं साकारलेल्या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयांमध्ये त्याचा मोठा हातभार लागला आहे.
भेदक गोलंदाजांमध्ये शमी, बुमरा अव्वल!
एकीकडे फलंदाजांनी धावांची लयलूट केली असताना दुसरीकडे गोलंदाजांनीही आपल्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांची भंबेरी उडवल्याचं पाहायला मिळालं. या यादीत अंतिम सामना वगळता सर्वाधिक बळी मिळवत मोहम्मद शमीनं फक्त ६ सामन्यांमध्ये २३ बळींसह अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याच्यापाठोपाठ १० सामन्यांमधून २२ बळी मिळवणारा अॅडम झॅम्पा दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा जसप्रीत बुमरा १८ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.
आता यातल्या कोणत्या खेळाडूच्या गळ्यात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची माळ पडते, हे अंतिम सामन्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.