India vs Australia, U19 World Cup Final : १९ वर्षांखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या संघाचा ऑस्ट्रेलियाकडून मोठा पराभव झाला. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार उदय सहारन याने पराभवावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, संपूर्ण विश्वचषकादरम्यान आमच्या सर्व खेळांडूनी चांगला खेळ केला. अंतिम सामन्यासाठी आमची तयारीही चांगली झाली होती. पण आज आम्ही खेळपट्टीवर अधिक काळ थांबू शकलो नाहीत. जी तयारी केली होती, त्याप्रमाणे खेळ सादर करण्यात आम्ही कमी पडलो. उदय सहारन पुढे म्हणाला की, या स्पर्धेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आमच्या सपोर्ट स्टाफनेही आम्हाला खूप सहकार्य केलं. या स्पर्धेतून धडा घेऊन आम्ही पुढे जाऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला.

U19 WC Final : कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन् भारताने विश्वचषक गमावला, मोहम्मद कैफने केलं पराभवाचं विश्लेषण

भारताचा युवा संघ निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. ४३.५ षटकांत अवघ्या १७४ धावांपर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजांना मजल मारता आली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा निकराने सामना केला. परंतु या दोघांव्यतिरिक्त इतर कुठल्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही.

भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

भारताने धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय धिम्या गतीने केली. तिसऱ्याच षटकात भारताचा सलामीचा फलंदाज अर्शीन कुलकर्णी केवळ ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर २५ षटकात भारताने ९१ धावांवर ६ गडी गमावले होते. सलामीवीर आदर्श सिंह व्यतिरिक्त एकही खेळाडू खेळपट्टीवर टीकू शकला नाही. कर्णदार उदय सहारन १८ चेंडूत केवळ ८ धावा करून माघारी गेला. तर या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा मुशीर खान ३३ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. तर ज्याच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या तो बीड जिल्ह्यातील सचिन धस ८ चेंडूत फक्त ९ धावा करून बाद झाला. अखेरच्या काही षटकात मुरुगन अभिषेक या तळातील फलंदाजाने ताबडतोब फटकेबाजी करत ४६ चेंडूत ४२ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकला.

ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाच गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. राफेल मॅकमिलन आणि महिल बीअर्डमन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. कॉलम विडलरने २ बळी टीपले. तर चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रॅकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. त्या तुलनेत भारतीय गोलंदाजांना फार उजवी कामगिरी करता आली नाही. राज लिंबानी याने तिसऱ्या शटकात सॅम कोन्स्टासला शून्यावर बाद केल्यानंतर थेट २१ षटकात दुसरा गडी बाद करण्यात गोलंदाजांना यश आलं. तोपर्यंत हॅरी डिक्सन आणि कर्णधार ह्यूग वेबगन यांनी ७८ धावांची भागिदारी रचली होती. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतीय गोलंदाजांना एकापाठोपाठ बळी मिळवता आले नाहीत, तिथेच भारताच्या हातून सामना निसटला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus icc u19 world cup final after india lost from australia skipper uday saharan comment on performance kvg