टीम इंडियाच्या फलंदाजांनी आता जबाबदारीने खेळणे अपेक्षित आहे. कारण गोलंदाजांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. जर फलंदाज धावफलकावर धावा लावण्यात सातत्याने अपयशी ठरले तर मग गोलंदाजांना दोष देण्यात काहीच अर्थ उरणार नाही, अशा कानपिचक्या विराटने सामन्याच्या पूर्वसंध्येला फलंदाजांना दिल्या. उद्यापासून (२६ डिसेंबरपासून) भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात काय घडले याकडे लक्ष न देता या सामन्यातील कामगिरीवर लक्ष देण्याचा सल्लाही विराटने संघाला दिला.

आपण जर प्रथम गोलंदाजी करत असलो, तर दुसऱ्या डावात आपण प्रतिस्पर्ध्यांनी उभारलेल्या धावसंख्येच्या जवळ जाण्याचे किंवा आघाडी घेण्याचे प्रयत्न करू. जर पहिल्या दोन डावात दोनही संघाच्या धावा जवळपास समानच असतील, तर सामना तिसऱ्या आणि चौथ्या डावातील खेळावर अवलंबून राहील. अशा वेळी पहिल्या डावातील आघाडी उपयोगी ठरेल, असे विराटने सांगितले.

एखाद्या फलंदाजाने चांगली कामगिरी करावी असे मी म्हणणार नाही. या उलट फलंदाजांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण जोवर फलंदाज चांगली कामगिरी करत नाहीत, तोवर गोलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाहीत. मालिकेत आतापर्यंत काय झाले याकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नाही. सामन्यात तुम्ही जेव्हा मैदानावर असता तेव्हा तुम्ही कसे खेळता, हे महत्वाचे आहे, असे त्याने नमूद केले.

Story img Loader