अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. अवघ्या एका दिवसाचा खेळ राहिला आहे आणि अजून १९ विकेट्सचा खेळ बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या हा चौथा कसोटी सामना निकाली निघण्याची फार कमी अपेक्षा असली, तरी उभय खेळाडूंचे त्यांच्या प्रदर्शनासाठी कौतुक होत आहे. मात्र त्याच दरम्यान मोहम्मद शमीला तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती, याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी जडेजाला चांगलेच सुनावले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. आज पाचव्या दिवसाचा खेळ खेळला जात आहे पण भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर आपल्या संघाच्या कामगिरीवर खूश नाहीत. मोहम्मद शमीने नव्या चेंडूवर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरूनही ते खूपच नाराज आहे. त्यांनी लाईव्ह सामन्यादरम्यान मोहम्मद शमीला इंदोर कसोटीत विश्रांती देण्यावरून नाराजी व्यक्त करत भारतीय संघाला काही प्रश्न विचारले आहेत.
महत्त्वाच्या सामन्यात संघाला गरज असताना विश्रांती देणे समजण्यापलीकडे-गावसकर
तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद शमीने या सामन्यात पुनरागमन केले. या सामन्यात त्याला नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करता आली याचे सुनील गावसकर यांना फार वाईट वाटले. वेगवान गोलंदाजाने फिटनेस राखला पाहिजे, असेही माजी फलंदाजाचे मत आहे. ते म्हणाले, “महत्त्वाच्या सामन्यात संघाला गरज असताना विश्रांती देणे समजण्यापलीकडे आहे. दुसरी कसोटी ही केवळ अडीच दिवसात संपली आणि त्यात दुसऱ्या कसोटीचे दोन दिवस तसेच तिसऱ्या कसोटी आधीचे आठ दिवस म्हणजे जवळपास दहा दिवस मध्ये वेळ होता. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने १४ षटके गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात २ षटके म्हणजे केवळ १६ षटके गोलंदाजी करून तुम्ही लगेच कसे काय थकून जावू शकतात? मला कळतच नाही.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “ज्यावेळेस गोलंदाज लयीत असतो अशावेळी त्याला विश्रांती दिल्यास त्याची लय बिघडते ही साधी गोष्ट भारतीय संघ व्यवस्थापनाला कळत कशी नाही,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. लिटल मास्टर पुढे म्हणाले, “चांगल्या गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच फलंदाजाला बाद करायचे असते. शमी त्याच्या लाईन-लेथ पासून भरकटला होता. त्याने खूप वाईड बॉल टाकले. मोहम्मद शमी हा लयीत गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याला विश्रांती दिली नसती तर आज निकाल कदाचित वेगळा राहिला असता.”