IND vs AUS Team India Coach Amol Muzumdar : रविवारी ‘करा या मरो’च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. यानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. आता भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल, ज्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचता येईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे कोच अमोल मुझुमदार यांनी पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय प्रशिक्षक अमोल मुझुमदार काय म्हणाले?

सामन्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने भारतीय प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या समीकरणाबद्दल विचारले. यावर मजुमदार हसले आणि म्हणाले की, ‘हा चांगला प्रश्न आहे. मी पाकिस्तानला शुभेच्छा देऊ इच्छितो. मी एवढेच म्हणू शकतो आमचे या सामन्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत, हे नक्की.’

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट होते. टीम इंडियाने काही झेल सोडले आणि शेवटच्या दोन षटकात श्रेयंका पाटीलने १४ आणि १२ धावा दिल्या. तथापि, भारतीय प्रशिक्षकाने सांगितले की, तो टर्निंग पॉइंट म्हणून कोणत्याही विशिष्ट क्षणाकडे निर्देश करू इच्छित नाही. कारण शेवटी हा सांघिक प्रयत्न होता. या अनुभवातून भारतीय संघ धडा घेईल आणि आगामी काळात निकाल आपल्या बाजूने असतील, अशी आशा मुझुमदार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – PAK vs ENG : बाबर आझमला साथ देणे फखर जमानला पडू शकते महागात, पीसीबीचे अधिकारी ‘त्या’ पोस्टमुळे नाराज

अमोल मुझुमदारयांनी पाकिस्तानला दिल्या शुभेच्छा –

अमोल मुझुमदार म्हणाले, ‘यावेळी मला नेमक्या १४व्या किंवा १६व्या षटकाबद्दल बोलायला आवडणार नाही. हा एक सामूहिक प्रयत्न आहे. यामध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. आम्ही सामन्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते की काहीही झाले तरी हा गट विशेष समूह आहे. आम्ही एकमेकांची काळजी घेतो. मला खात्री आहे की येत्या काही दिवसांत निकाल आमच्या बाजूने येईल. मला त्या षटकांबद्दल किंवा सोडलेल्या झेलांबद्दल बोलायला आवडणार नाही. हे खेळात घडते. आम्हाला फक्त या अनुभवातून आणि निराशेतून शिकायचे आहे.’ भारताने चार सामन्यांतून चार गुणांसह ग्रुप स्टेजचा शेवट केला.

हेही वाचा – IND vs AUS : ‘जेव्हा मी आणि दीप्ती फलंदाजी करत होतो, तेव्हा…’, हरमनप्रीत कौरने सांगितले भारताच्या पराभवाचे कारण

या सामन्यापूर्वी भारताचे नेट रन रेट +०.५७६ होता. आता तो +०.३२२ पर्यंत घसरला आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया आठ गुणांसह आणि +२.२३३ च्या नेट रन रेटने गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड संघ आहे, ज्याचे नेट रन रेट +०.२८२ आहे. जर त्यांनी चौथ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर किवी संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचेल आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. या स्थितीत भारताला पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.