पर्थ कसोटीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यात झालेला वाद चांगलाच रंगला. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, याचसोबत विराटवर त्याच्या आक्रमक वागण्यावरुन टीकेला सुरुवात झाली. अनेक माजी खेळाडूंनी विराटवर टिकेची झोड उठवली. मात्र दुसरीकडे काही दिग्गज खेळाडूंनी विराटच्या वागण्याचं कौतुकही केलं. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज सर व्हिविअन रिचर्ड्स यांनीही कोहलीला आपला पाठींबा दर्शवला आहे.
अवश्य वाचा – IND vs AUS : भारताला अजुनही मालिका विजयाची संधी – सौरव गांगुली
“भारतीय संघ आता बदलला आहे, तो 70-80 च्या दशकातला भारतीय संघ राहिलेला नाही. मात्र असे बदलं होणं गरजेचं असतं. विराटची मैदानावरची आक्रमकता मला आवडते, याच चुकीचं काहीच नाही. प्रतिस्पर्धी संघाला भारत आता जशास तसं उत्तर द्यायला शिकलाय…आणि क्रिकेट याच गोष्टींसाठी ओळखलं जातं. अनेकांना कोहलीच्या आक्रमकतेबद्दल समस्या आहेत. तो मैदानात गरज नसताना आक्रमक होतो असं काहींचं म्हणणं आहे, मात्र मला असं वाटत नाही. कर्णधार म्हणून विराटला प्रत्येक सामन्याचा एक निकाल हवा असतो, ज्यावेळी तुमचा कर्णधार आक्रमकपणे उभा राहतो त्यावेळी अशा गोष्टी होणारच. कोहलीच्या या आक्रमकतेचे निकाल आपण आता पाहतच आहोत, भारतीय संघाला हरवणं आता सोपं राहिलेलं नाही.” रिचर्ड्स यांनी आपलं मत मांडलं.
अवश्य वाचा – IND vs AUS : शशी थरुरांनी सोडवला भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न…
पहिल्या कसोटीत भारताने धडाकेबाज खेळ करत मालिकेत आघाडी घेतली. मात्र ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केलं आहे ते पाहता, त्यांना कमी लेखून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ सहज हार मानणाऱ्यातला नाहीये. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असली, तरीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानात सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.