India vs Australia 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदोरमधील होळकर स्टेडियममध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कांगारूंना तो महागात पडला असे दिसत आहे. भारताने ३९९ धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नवीन इतिहास रचला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंदोरमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी कांगारूंना अक्षरशः झोडपले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाने ४०० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या ३८३ धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये केली होती.

दुसरीकडे त्याचवेळी, एकूण वन डेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या ४१८/५आहे, जी त्यांनी डिसेंबर २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदोरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतासाठी शुबमन गिल श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतके, तर के एल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली भारताची सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्याठिकाणवर्ष
३९९/५इंदोर२०२३
३८३/६बंगळुरू२०१३
३६२/१जयपुर२०१३
३५८/९मोहाली२०१९
३५४/७नागपूर२००९

एकदिवसीय सामन्यात भारताची सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्यासंघाविरुद्धठिकाणवर्ष
४१८/५वेस्ट इंडीजइंदोर२०११
४१४/७श्रीलंकाराजकोट२००९
४१३/५बर्म्युडापोर्ट ऑफ स्पेन२००७
४०९/८बांग्लादेशचट्टोग्राम२०२२
४०४/५श्रीलंकाईडन गार्डन्स२०१४
४०१/३दक्षिण अफ्रीकाग्वाल्हेर२०१०
३९९/५ऑस्ट्रेलियाइंदोर२०२३

हेही वाचा: IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video

भारताकडून शुबमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावा, श्रेयस अय्यरने ९० चेंडूत १०५ धावा आणि कर्णधार केएल राहुलने ३८ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी इंदोरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा १३ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये २४ चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अ‍ॅबॉट आणि अ‍ॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.