IND vs AUS Irfan Pathan Slam Australia Media Former Cricketer : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोस्टन्सला जाणीवपूर्वक धक्का दिला. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने आता वेग घेतला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने मॅच रेफरीसमोर आपली चूक मान्य केली आणि त्याला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियन मीडियाने या प्रकरणाचा अतिशयोक्ती केला आणि वर्तमानपत्रात विराट कोहलीला जोकर म्हणून दाखवण्यात आले. यानंतर इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन मीडियाला खडे बोल सुनावले.
इरफान पठाण काय म्हणाला?
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन मीडियासमोर त्यांच्या खेळाडूंच्या लाजिरवाण्या कृत्यांची यादीच वाचून दाखवली. विराट कोहलीला जोकर म्हणून संबोधणाऱ्या वर्तमानपत्राला इरफान पठाणने आरसा आणि त्याची पात्रता दाखवून दिली. इरफान पठाण म्हणाला, “विराटने जे केले, ते चुकीचे होते आणि ते आम्ही सर्वांनी मान्य केले. मात्र, तुम्ही आपल्या खपासाठी विराटला एकदा राजा आणि जोकर म्हणत आहात. तुम्हाला अधिक प्रसिद्ध मिळवायची आहे, पण कशावर? यासाठी तुम्ही विराट कोहलीचा खांदा वापरत आहात, त्याच्या मार्केट व्हॅल्यूचा गैरफायदा घेत आहात. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. माजी क्रिकेटपटू म्हणून आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. कारण हे गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे.”
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मेलबर्नच्या मैदानावर जे काही घडले, त्यावरून दोन्ही देशांचे माजी क्रिकेटपटू आणि माध्यमांमध्ये वाद पेटला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इतिहास लाजिरवाणा राहिला आहे. त्यांनी क्रिकेट खेळाची लाज काढणाऱ्या अनेक कृती केल्या आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन सलामीवीराला धक्काबुक्की केल्याबद्दल विराट कोहलीची निंदा केली, पण माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना त्यांचे खरे चेहरेही दाखवले. या दिग्गजाने एकामागून एक अशा अनेक गोष्टींची आठवण करून दिली, ज्यामुळे क्रिकेट बदनाम झाले होते.
इरफान म्हणाला खेळाडूच्या तोंडावर कोण थुंकलं होतं –
इरफान पठाने विराट कोहलीवर सामन्यांची बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना स्वतःमध्ये डोकावण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या पहिल्या सत्रानंतर ब्रेकमध्ये सुनील गावस्कर यांच्याशी संवाद साधताना इरफान पठाणने विचारले की कोणत्या देशाच्या खेळाडूने अंडर आर्म बॉलिंग केली? सँड पेपरने चेंडूशी छेडछाड करताना कोण पकडले गेले? तुमच्या खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या नाहीत का?
इरफान पठाण पुढे म्हणाला, “तुम्हाला आठवत असेल तर, तुमच्या संघातील एका खेळाडूने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या कुटुंबावर अश्लील टिप्पणी केली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडू विरोधी संघाच्या तोंडावर थुंकले होते. अशा अनेक घटना आहेत, त्यामुळे विराट कोहलीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या खेळाडूंचाही विचार करा.”