IND vs AUS 4th Test: ईशान किशन (Ishan Kishan) व भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे बॉण्डिंग अगदी कमाल आहे. मुंबई इंडियन्सच्या वतीने खेळताना अनेकदा त्यांची मैत्री पाहायला मिळाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल ५ वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात दुहेरी शतक झळकवणात भारतीय क्षेत्ररक्षक व फलंदाज ईशान किशनने सुद्धा अनेक चाहत्यांच्या मनामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या दोन्ही यशस्वी खेळाडूंचे एकमेकांशी कितीही उत्तम नाते असले तरी कधी कधी मैदानावर अशा काही गोष्टी घडतात ज्या बाहेरच्या मंडळींना ऐकून जरा धक्काच बसू शकतो. ईशान किशनने सुद्धा रोहित शर्माच्या सह खेळताना आलेले काही अनुभव शेअर करून चाहत्यांना शॉक दिला आहे.
ईशान किशनने एका मुलाखतीत रोहित बद्दल आधी कौतुक करून मग मूळ मुद्द्याला हात घातला होता. ईशानचे म्हणणे होते की रोहित एरवी मैदानावर खूप शांत असतो त्याचे खेळण्याकडे व मैदानाकडे सुद्धा अगदी बारीक लक्ष असते पण जर काही कारणाने त्याला राग आला तर मग तो खेळाडूंना सुद्धा शिव्या देतो. एकदा आपल्यालाही त्याचा असाच अनुभव आल्याचेही ईशानने पुढे सांगितले. याशिवाय ईशान म्हणतो की, “मैदानात काहीवेळा रोहित भाईचे निर्णय बघून प्रश्न पडतात पण खेळताना जाणवते की जी फिल्डिंग त्यांनी लावलेली असते तीच एकदम योग्य ठरते.”
रोहित भाई शिव्या देऊन वर…
ईशानने रोहितच्या शिव्या खाल्ल्याचा एक अनुभव सुद्धा शेअर केला आहे. तो सांगतो की, “चेंडू जसा जुना होईल तसा त्याचा बाउन्स उत्तम होतो त्यामुळे आम्ही एकदा बॉल जमिनीवर पडलेल्या पाण्यात आपटून त्याला थोडा जुना करण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्यावेळी आधी जमिनीवर आणि मग रोहित भाईच्या दिशेने बॉल फेकला, बॉल ओला असल्याने कदाचित त्यांना लागला असावा म्हणून त्यांनी आधी बॉल पुसला आणि मग मला चांगली सडकून शिवी देत विचारले की काय करतोय तू.. असं असलं तरी रोहित भाई स्वतःच नंतर येऊन कोणीही मनाला लावून घेऊ नका असेही सांगतात”.
हे ही वाचा<< हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला बॉडी बिल्डर्सचा ‘तो’ Video व्हायरल; काँग्रेस नेते गंगाजल घेऊन गेले अन् थेट…
दरम्यान, ईशान किशन हा मागील आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेला सर्वात महाग खेळाडू आहे. त्याच्यासाठी अंबानींनी १५ कोटी २५ लाख मोजले होते. यंदा मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरुद्ध २ एप्रिल २०२३ ला खेळला जाणार आहे.