ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारताने चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळाच्या जोरावर २५० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवातही फारशी चांगली झालेली नाहीये. इशांत शर्मा आणि फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाअखेरीस ७ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर अॅरोन फिंचला त्रिफळाचीत करुन इशांतने भारताला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळात इशांत शर्माने ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला बाद करत स्वतःला मानाच्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवून दिलं आहे.
इशांतने ६३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला बाद केले. पेनचा झेल यष्टीरक्षक ऋषभ पंतने घेतला. या विकेटसह इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा इशांत भारताचा नववा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २० सामन्यात १११ विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज –
- अनिल कुंबळे – १११
- हरभजन सिंह – ९५
- कपिल देव – ७९
- रविचंद्रन आश्विन – ७४
- झहीर खान – ६१
- इरापल्ली प्रसन्ना – ५७
- बिशनसिंह बेदी – ५६
- शिवलाल यादव – ५५
- इशांत शर्मा – ५०*
- रविंद्र जाडेजा – ४९
तळटीप – ही आकडेवारी अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवसापर्यंतची आहे.