IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins create new record : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील बहुप्रतिक्षीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला आजपासून सुरुवात झाली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्यातील नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी मैदानात उतरताच एक मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कमिन्स आणि बुमराह जगातील सहावी जोडी ठरली –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व केल्याचे क्वचितच घडले आहे. आता पुन्हा एकदा पर्थमधील कसोटीत हे घडले आहे, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत असे फक्त पाचवेळा घडले होते, जेव्हा कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधार वेगवान गोलंदाज होते. आता या यादीत कमिन्स आणि बुमराह ही सहावी जोडी ठरली आहे.
आतापर्यंत जसप्रीत बुमराहने केवळ एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, तर पॅट कमिन्सने २८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात बुमराहने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर पॅट कमिन्सने २८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने १७ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. त्याचबरोबर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
एकाच कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व करणारे वेगवान गोलंदाज –
बॉब विलिस (इंग्लंड) विरुद्ध इम्रान खान (पाकिस्तान), १९८२ (बर्मिंगहॅम)
वसीम अक्रम (पाकिस्तान) विरुद्ध कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज), १९९७ (पेशावर)
हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) विरुद्ध शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), २००१ (बुलावायो)
जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) विरुद्ध सुरंगा लकमल (श्रीलंका), २०१८ (ब्रिजटाऊन)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध टिम साउदी (न्यूझीलंड), २०२४ (ख्रिस्टचर्च)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध जसप्रीत बुमराह (भारत) २०२४ (पर्थ)
© IE Online Media Services (P) Ltd