India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयसने उत्कृष्ट शतक झळकावले. दुखापतीतून परतल्यानंतर अय्यरची ही सर्वात शानदार खेळी आहे. अय्यरने आपले शतक पूर्ण करण्यासाठी ८६ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने ३ षटकार आणि १० चौकारही लगावले. विश्वचषकापूर्वी अय्यरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला नक्कीच दिलासा मिळाला असेल. दरम्यान श्रेयस अय्यरचा शॉन अॅबॉटने अप्रतिम झेल पकडला आणि त्यानंतर अंपायरने त्याला नाबाद असल्याचा निर्णय दिला, त्याची सध्या यावर सोशल मीडियात खूप चर्चा सुरु आहे.
श्रेयस अय्यरचे शानदार शतक
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वन डे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले आहे. मार्चमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर होता. यानंतर त्याने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन केले, मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. आता शतक झळकावून श्रेयसने विश्वचषकातून विरोधी संघांना इशारा दिला आहे. त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने देखील त्याच्या शतकामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. श्रेयसचाही विश्वचषक संघात समावेश आहे.
श्रेयसला मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेता आला नाही
३१व्या षटकात प्रचंड नाट्य पाहायला मिळाले. खरे तर या षटकात शॉन अॅबॉट गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अॅबॉटने श्रेयसला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. यानंतर श्रेयस पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, ऑनफिल्ड अंपायर या झेलवर पूर्णपणे समाधानी दिसत नव्हते आणि त्यांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवले. थर्ड अंपायरने रिव्ह्यूमध्ये पाहिले की कॅच घेताना अॅबॉट पूर्ण नियंत्रणात नव्हता आणि चेंडूही जमिनीवर आदळला होता. अशा स्थितीत श्रेयसला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात बोलवण्यात आले.
श्रेयसला एकप्रकारे जीवनदान मिळाले आणि तिसऱ्या अंपायरने त्याला नॉट आऊटचा निर्णय दिला. श्रेयस परतला आणि पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र, त्याला जीवनाच्या लीजचा फायदा घेता आला नाही आणि त्याने पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा त्याची विकेट गमावली. यावेळी अॅबॉटच्या चेंडूवर श्रेयस मॅथ्यू शॉर्टकरवी झेलबाद झाला. श्रेयसने ९० चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १०५ धावांची खेळी केली. श्रेयसने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली.