भारताने अपेक्षेनुसार बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू केली आहे. पहिल्या कसोटीत यजमानांनी ऑस्ट्रेलियाचा १३२ धावांनी पराभव केला. मात्र संघ निवडीबाबतची चर्चा अद्याप संपलेली नाही. मुद्दा आहे गेल्या वर्षभरापासून टीकेचा बळी ठरलेल्या केएल राहुलचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो पुन्हा स्वस्तात तंबूत परतला, त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
पहिल्या कसोटीत राहुलने ७१ चेंडूंचा सामना केला आणि त्याला केवळ २० धावा करता आल्या. राहुलला टीम इंडियाकडून सतत पाठिंबा मिळत आहे. पण तो प्रत्येक वेळी अपेक्षा धुडकावतो. शुबमन गिलसारख्या द्विशतकाला त्याच्या पाठीमागे बाकं गरम करावी लागत आहेत असे म्हणत व्यंकटेश प्रसादने टीका केली होती. राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी चाहते सातत्याने करत आहेत. त्याचबरोबर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही संधी मिळण्यावर आक्षेप घेतला आहे. आता सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे की, दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणार का? माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि मदन लाल यांनी राहुलला पाठिंबा देत त्याला आणखी एक संधी देण्याची मागणी केली आहे.
केएल राहुलला आणखी एक संधी मिळाली पाहिजे – सुनील गावसकर
इंडिया टुडेचा हवाला देत सुनील गावसकर म्हणाले, “मला वाटते की गेल्या एक-दोन वर्षांत त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, त्याने चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते त्याला आणखी एक संधी द्यायला हवी. मला खात्री आहे की दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला पाठिंबा मिळेल. त्यानंतर तुम्ही त्याचा विचार करू शकता कारण तुमच्याकडे फॉर्मात असलेला फलंदाज शुबमन गिल त्याच्या जागी तयार आहे. त्याचे एक शतक मागील एक वर्षातील संपूर्ण फ्लॉप शो वरील मळभ दूर सारेल आणि सर्व टीकाकारांची तोंड बंद होतील.” असा मार्मिक टोला भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादला नाव न घेता लगावला.
माजी भारतीय क्रिकेटपटू विक्रम राठौडने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे केएल राहुलच्या शतकाची पत्रकार परिषदेत आठवण करून दिली. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणाऱ्या ११ खेळाडूंपैकी राहुल एक आहे. त्याचवेळी मदन लाल यांनी राहुलबद्दल असेही म्हटले की, “त्याच्याकडे क्षमता आहे पण तो अलीकडे खराब फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करणे हे एक मोठे आव्हान आहे आणि त्या धावा मिळवणे हे मनोबल वाढवते. पण तो इथे अडकू शकतो. मात्र, त्याच्या क्षमतेच्या जोरावर त्याला आणखी एक संधी मिळायला हवी.”