India vs Australia ICC World Cup Final 2023: स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ असूनही, भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (१९ नोव्हेंबर) विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. ट्रॅविस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. फायनलमध्ये टीम इंडियाच्या बाबतीत काय झालं याची चर्चा आता अनेक तज्ज्ञ करत आहेत. के.एल. राहुलच्या संथ फलंदाजीमुळे भारताने सामना गमवला, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने व्यक्त केले.
के.एल. राहुलने खूप डॉट बॉल खेळण्याची चूक केली: शोएब मलिक
शोएब मलिकने ‘ए’ स्पोर्ट्सवरील संभाषणात सांगितले, “के.एल. राहुल संपूर्ण ५० षटके फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने हे न करता आपला नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. जर तुम्ही कठीण परिस्थितीत फलंदाजी करत असाल आणि चौकार सहज येत नसतील तर किमान तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावा लागेल. तुम्ही त्यावेळी एकेरी-दुहेरी धाव घेणे गरजेचे असते. १०७ चेंडूत ६६ धावा करून ५० षटके खेळणे इथेच त्याने बचावात्मक दृष्टीकोन दाखवला. जरी त्याने बरेच डॉट बॉल खेळले होते तरी भारताची धावसंख्या पुढे जात नव्हती, त्यामुळेचं भारतीय संघ अडचणीत आला.”
मलिक पुढे म्हणाला, “जेव्हा भारत झटपट विकेट्स गमावतो तेव्हा त्याच्यावर खूप जबाबदारी येते. आज त्याची १०७ चेंडूत ६६ धावांची जर खेळी पाहिली तर ती के.एल. राहुलची खेळी आहे असे वाटत नव्हती. तो अशा मानसिकतेमध्ये गेला जिथे त्याला फक्त पूर्ण ५० षटके खेळायची होती. तो जरा जास्तच सक्रिय असायला हवा होता.”
माजी पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, “ज्या मैदानावर हा सामना खेळला गेला त्या मैदानावरील बाउंड्री खूप मोठी होती. ऑस्ट्रेलियाने याचा चांगला वापर केला.” तो पुढे म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाने ठरवले होते की, आम्ही सरळ फटके मारू देणार नाही. तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेटवर खेळू शकता. त्यांच्या गोलंदाजांनी या खेळपट्टीचा उत्कृष्ट वापर केला. ऑस्ट्रेलियाने भारताच्या परिस्थितीचे टीम इंडियापेक्षा चांगले मूल्यांकन केले आणि नंतर आपल्या योजना अंमलात आणल्या.”
मिस्बाह-उल-हक त्या कार्यक्रमात म्हणाला, “के.एल. खूप चांगले फिरकी खेळतो आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत ते पाहिले आहे. तो विकेटच्या बाहेर आणि विकेटसमोर चांगला चौरस खेळतो, त्याच्या फुटवर्कचा चांगला वापर करतो. पण आज त्याची मानसिकता अशी होती की, तो खराब चेंडूची वाट पाहत होता. त्याला कदाचित इतर फलंदाजांवर विश्वास नव्हता. तो त्यावेळी संघाला २५० पर्यंत नेण्याचा विचार करत होता आणि ते भारतासाठी कठीण झाले.” या पराभवामुळे भारताची आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा लांबली. भारताने १२ वर्षांपूर्वी २०११ मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता आणि १० वर्षांपूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.