India vs Australia 1st ODI: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची वन डे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (दि. २२ सप्टेंबर) खेळला जात आहे. भारतीय कर्णधार के.एल. राहुल याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारतीय संघात पाच दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्यात प्रामुख्याने रविचंद्रन अश्विन आणि दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यर यांचे संघात बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन झाले.
भारताने नाणेफेक जिंकली
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात लोकेश राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असल्याचे राहुल म्हणाला. या कारणास्तव त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचा के.एल. राहुल याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की, “भारतीय संघात ५ बदल करण्यात आले आहेत. त्यात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.” दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सांगितले की, “ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाहीत. तसेच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श डावाची सुरुवात करतील आणि स्टीव्ह स्मिथ आजच्या सामन्यात खेळणार आहे.”
भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ बनू शकतो
आजचा सामना जिंकून भारतीय संघ आयसीसी वन डे क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचू शकतो. कसोटी आणि टी२० मध्ये टीम इंडिया आधीच अव्वल आहे. अशा स्थितीत भारताला आज तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ संघ बनण्याची संधी आहे. वन डे क्रमवारीत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान पहिल्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पहिल्या तीन संघांमधील गुणांमधील फरक खूपच कमी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला नाही
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम चांगला नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण १४६ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने ५४ आणि ऑस्ट्रेलियाने ८२ जिंकले आहेत. त्याच वेळी, १० सामने अनिर्णित राहिले. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये ६७ वन डे सामने झाले आहेत. भारताने ३० सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ३२ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाच सामने अनिर्णित राहिले. मोहालीच्या मैदानावर दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने केवळ एकच सामना जिंकला आहे. या मालिकेत टीम इंडियाचे आकडे सुधारायचे आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग-११
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.
भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.