भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपला. कुलदीप यादवच्या ५ बळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेतली आणि यजमान संघावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. पहिल्या डावात कुलदीपने उत्तम गोलंदाजी केली आणि ६४ वर्षांपूर्वीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाने एकूण ६ गडी गमावले. त्यापैकी उस्मान ख्वाजा (२७), ट्रेव्हिस हेड (२०) आणि कर्णधार टीम पेन (५) हे ३ गडी कुलदीपने टिपले. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात त्याने आधी लॉयनला शून्यावर तंबूत धाडले. शेवटच्या जोडीने चांगली झुंज देत ४२ धावांची भागीदारी केली. अखेर कुलदीपनेच ती जोडी फोडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर संपवला.
या पाच बळींच्या कामगिरीसह कुलदीपने एक विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघातील डावखुऱ्या मनगटी फिरकीपटूने (चायनामन गोलंदाज) ५ बळी टिपण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. या आधी इंग्लंडच्या जॉनी वॉर्डल याने १९५५ साली सिडनीच्या मैदानावरच ७९ धावा खर्चून ५ बळी टिपले होते. त्यानंतर ६४ वर्षांनी आज कुलदीपने ९९ धावांत ५ गडी बाद केले.
Five-wicket hauls by visiting left arm wrist spinners in Australia
5/79 – Johnny Wardle (Eng) at Sydney 1955
5/99 – Kuldeep Yadav (Ind) at Sydney 2019#AusvInd #AusvsInd— Mohandas Menon (@mohanstatsman) January 6, 2019
दरम्यान, या पराक्रमानंतर चौथ्या दिवसाचा खेळही अंधुक प्रकाशामुळे काही काळ थांबवण्यात आला.