India vs Australia 3rd ODI: विश्वचषकाची रंगीत तालीम समजली जाणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा ६६ धावांनी पराभव करत व्हाईटवॉश टाळला. आजच्या पराभवाने भारतीय संघातील काही उणीवा या समोर आल्या असून त्यावर विश्वचषकाआधी होणाऱ्या सराव सामन्यात सुधाराव्या लागतील. टीम इंडियाला आपली प्लेईंग-११ व्यवस्थित निवडावी लागणार आहे. सतत संघात होणारे बदल हे टाळावे लागतील आणि यावर संघ व्यवस्थापनाला देखील विचार करावा लागेल.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वन डे मालिका विजयासह संपुष्टात आणली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही टीम इंडियाने ही मालिका २-१ अशी जिंकली. मात्र, प्रथमच वनडे मालिकेत कांगारू संघाविरुद्ध क्लीन स्वीप करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला.
टीम इंडियाला विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव घेतली. प्रसीध कृष्ण खाते न उघडता नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. रवींद्र जडेजाने ३५ आणि के.एल. राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि १८ धावा करून बाद झाला.
सूर्यकुमारला सामना पूर्ण करता आला नाही
सूर्यकुमारला हा सामना पूर्ण करता आला नाही. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने पाच आणि कुलदीप यादवने दोन धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडला दोन यश मिळाले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन आणि तन्वीर संघाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली
त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ८४ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने १० षटकांत ८१ धावा दिल्या.