भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. हॅरिस, फिंच व हेड यांनी केलेली अर्धशतके आणि मार्श (४५) व कर्णधार पेन (३८) यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची शेपूट त्रिशतकानंतर झटपट गुंडाळली. पण त्यानंतर मिचेल स्टार्कने मुरली विजयचा त्रिफळा उडवला त्याचीच पहिल्या सत्रानंतर अधिक चर्चा रंगली.

ऑस्ट्रेलियाचा डाव सम्पल्यानंतर उपहाराची विश्रांती घेण्यास अवधी होता. त्यामुळे भारतीय सलामीवीर विजय आणि राहुल मैदानावर आले. पण तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टार्कने भन्नाट स्विंग चेंडू टाकत विजयला त्रिफळाचीत केले.

विजयला चेंडू समजण्याआधीच तो बाद झाला. बॅट आणि पॅड यांच्यात अगदी किंचितशी जागा होती. त्यातून चेंडू स्विंग होऊन त्रिफळा उडाला. त्यानंतर विजयच्या खराब फॉर्मबद्दल त्याला खूप ट्रोल करण्यात आले.

त्याआधी दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अखेर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडले. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स त्रिफळाचित झाला आणि आजच्या दिवसातील भारताला पहिले यश मिळाले. कमिन्स ६६ चेंडूत १९ धावा करून बाद झाला.  ३८ धावांची संयमी खेळी करणारा टीम पेन पायचीत झाला. बुमराहने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. मिचेल स्टार्क १० चेंडूत ६ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा नववा गडी बाद झाला. पंतने त्याचा झेल टिपला. पाठोपाठ हेजलवूडला शून्यावर बाद करत इशांतने ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.

Story img Loader