IND vs AUS Siraj Labuschagne Fight Virat Kohli Reaction Video: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना खेळवला जात असेल आणि त्यात खेळाडूंमध्ये वाद झाला नाही, असं चित्र फार क्वचितच पाहायला मिळेल. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारत पहिल्या डावात १५० धावा करत सर्वबाद झाला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारू फलंदाजांचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये कसोटीत पहिल्या डावात ७ बाद ६७ विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलिया अजूनही ८३ धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान सिराज आणि लबुशेनमध्ये थोडी शाब्दिक बाचाबाची झाली.
मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेनमध्ये कशावरून झाला वाद?
ऑस्ट्रेलियाच्या डावात मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेन एकमेकांशी भिडले. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १३व्या षटकात घडली, जिथे सिराजने लबुशेनला शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकला. इकडे सिराजचा चेंडू खेळल्यानंतर आत आला आणि लबुशेनच्या पॅडला लागला. तितक्यात चेंडू जवळ असलेला पाहून सिराज चेंडू उचलण्यासाठी पुढे आला. पण तितक्यात लबुशेनने त्याच्या बॅटने चेंडू क्रीझच्या दूर ढकलला. यानंतर सिराजने हातवारे करत काय अशी प्रतिक्रिया देत दोन्ही खेळाडू एकमेकांकडे रागाच्या भरात पाहत होते. दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लबुशेनने सिराजचा चेंडू जेव्हा खेळला तेव्हा फलंदाज क्रीझच्या बाहेर होता. सिराजला चेंडू उचलून स्टंपवर मारायचा होता, मार्नस लबुशेनने त्याला तसं करू दिलं नाही, यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज संतापला आणि सिराज त्याच्याकडे रोखून पाहत होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजही त्याच्याकडे रोखून पाहून लागला. पुढचे काही सेकंद दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होतं.
सिराज-लबुशेनच्या वादात विराट कोहलीची उडी
दुसरीकडे, मार्नस लबुशेनने चेंडू मुद्दाम ढकलेला पाहून कोहलीलाही राग आला, त्याने क्षेत्ररक्षकाकडून चेंडू मागितला आणि बेल्स उडवत आपली प्रतिक्रिया दिली. एकूणच काही मिनिटं मैदानावर तापलेलं वातावरण पाहायला मिळालं. यानंतर सिराजनेच शेवटी लबुशेनला बाद केलं.
सिराजने २१व्या षटकातील सहाव्या चेंडूवर लबुशेनला पायचीत केले. लबुशेन ५२ चेंडूंमध्ये २ धावा करून बाद झाला. लबुशेन मैदानावर उतरला तेव्हाच बाद झाला असता पण विराट कोहलीकडून टिपलेला झेल शेवटी सुटला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर लबुशेन स्लिपमध्ये विराटकडून झेलबाद झाला होताच पण विराट कोहलीचा हात जमिनीवर आपटल्याने चेंडू हातातून निसटला आणि लबुशेन वाचला. पण भारताच्या गोलंदाजांनी त्याला धावा करण्याची संधी दिली नाही.