ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांतून मुंबईकर खेळाडू पृथ्वी शॉ याला माघार घ्यावी लागली आहे. सराव सामन्यात त्याला झालेल्या दुखापतीतून तो अद्यापही सावरलेला नसल्यामुळे तो मालिकेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी संघात मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
BREAKING: @PrithviShaw has been ruled out of the remainder of the #AUSvIND Test series. @mayankcricket has been called up as his replacement.
https://t.co/nBlTkOTkm5 pic.twitter.com/7g8m9ceKDt
— ICC (@ICC) December 17, 2018
दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून विश्रांती दिलेला मुंबईकर पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीलाही मुकला होता. दुखापतीतून पृथ्वी पूर्णपणे सावरला नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. पर्थ कसोटीपूर्वी पृथ्वीने धावण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे चाहते आनंदात होते. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी १३ सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ तंदुरूस्त नसल्याचे समजले.
सराव सामन्यावेळी झेल घेताना पृथ्वी शॉ जखमी झाला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे पहिल्या कसोटीला पृथ्वी मुकला होता. दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. पहिल्या दोन कसोटींमध्ये पृथ्वीच्या अनुपस्थितीत राहुल आणि मुरली विजयने भारतासाठी डावाची सुरूवात केली होती. आता पृथ्वीच्या जागी मयंकला संधी देण्यात आली आहे.
पृथ्वी शॉला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. विंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावले होते. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने दमदार कामगिरी करत भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले होते.