तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्नाटकच्या मयांक अग्रवालला भारतीय संघात जागा मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात मयांकने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. गुरुवारपासून सुरु झालेल्या सिडनी कसोटी सामन्यातही मयांकने अर्धशतकी खेळी केली. मात्र आपलं पहिलं शतक झळकावण्याची नामी संधी चालून आलेली असतानाही उतावळेपणात उंच फटका खेळताना मयांक बाद झाला. त्याने ७७ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मयांक अग्रवालनेही आपल्याला चुकांमधून शिकण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“शतक झळकावण्याची संधी हुकल्याबद्दल मलाही वाईट वाटत आहे. मी नॅथन लॉयनवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्या पद्धतीने मी माझी विकेट फेकली ते खरचं दुर्दैवी होतं. पण माझ्यासाठी हा एक धडा होता. या चुकीमधून मला शिकण्याची गरज आहे.” मयांकने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपली बाजू मांडली. पहिल्या दिवशी पुजाराने झळकावलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३०३ धावांपर्यंत मजल मारली आहे.

सलामीवीर लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव चांगल्या पद्धतीने सावरला. दुसऱ्या विकेटसाठी पुजारासोबत शतकी भागीदारी केल्यानंतर चांगल्या फॉर्मात असताना मयांक अग्रवाल बाद झाला. मात्र सलग दुसऱ्या सामन्यात आश्वासक कामगिरी करुन त्याने सलामीच्या जागेवर आपली दावेदारी आणखी प्रबळ केली आहे.

Story img Loader